*राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० वरील तासगाव बायपासकरीता जमिनीच्या भुसंपादनाचे राजपत्र प्रसिद्ध*
राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० वरील विटा - तासगाव - म्हैसाळ या भागातील तासगाव शहरालगत असणाऱ्या बायपासकरीता भुसंपादनाचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे तासगाव बायपासचा प्रश्न मार्गी लागणार असून शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणेसाठी हे महत्वाचे पाऊल असलेबाबतची माहिती माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० वरील विटा - तासगाव - म्हैसाळ या भागातील तासगाव शहरालगत असणाऱ्या ६५ किमी लांबीच्या बायपासकरीता लागणाऱ्या जमिनीचे भुसंपादन व तो विकसित करणेकरीता निधी उपलब्ध करुन मिळणेकरीता केंद्रिय रस्ते विकास व परिवहन मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांचेकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० वरील विटा - तासगाव - म्हैसाळ या भागातील तासगाव शहरालगत असणाऱ्या बायपासकरीता भुसंपादनाचे राजपत्र आज प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या राजपत्रानुसार आळते, लिंब, विसापूर शिरगाव, शिरगाव, बोरगाव, ढवळी, वंजारवाडी, पानमळेवाडी, वासुंबे, कवठेएकंद, तासगाव या गावांमधील सुमारे ४९ हेक्टर जमिनींच्या भुसंपादन व अधिग्रहण करण्याबाबत सुचना प्रसिद्धीस देण्यात आलेली आहे.

