कोल्हापूर-सांगली हायवेचा मार्ग मोकळा

Admin
By -
     


             कोल्हापूर-सांगली हायवेचा मार्ग मोकळा झाला आहे. या महामार्गावरील चोकाक ते अंकली फाट्यापर्यंत भूसंपादित केली जाणारी जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यात आली आहे. त्याकरिता राष्ट्रीय महामार्ग कायद्याच्या कलम 3 (थी डी) नुसार जमीन अधिग््राहणाची अधिसूचना दि. 16 जानेवारी रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. यामुळे या महामार्गाला गती येईल. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
        रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील कोल्हापूर (चोकाक) ते अंकली फाटा (सांगली) या महामार्गाच्या रुंंदीकरणाचे काम भूसंपादनाअभावी रखडले होते. मात्र, याबाबत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार संपादनाची भरपाई देण्याबाबत निर्णय झाल्यानंतर या प्रलंबित कामाला गती आली आहे. सुमारे 33 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी आवश्यक जमिनीची अवघ्या आठ दिवसांत भूमिअभिलेख विभागाने मोजणी पूर्ण करून दिली आहे.

         या जागेची मोजणी पूर्ण झाल्यानंतर ही जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या थी डी गॅजेटची प्रक्रियाही गतीने राबविण्यात आली. दि.19 जानेवारी पर्यंत हे गॅझेट प्रसिध्द होईल, यासाठी जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रयत्न सुरू होते. दि.19 पर्यंत हे गॅझेट झाले नसते तर ही प्रक्रिया पुढील वर्षांत गेली असती आणि हा प्रकल्प आणखी रखडला असता. मात्र, दि.16 जानेवारी रोजीच ही प्रक्रिया पूर्ण झाली. केंद्र शासनाच्या राजपत्रात ही अधिसूचना प्रसिध्द झाली.

       चोकाक ते अंकली फाट्यापर्यंतची रस्त्यासाठी आवश्यक जमीन अधिग््राहीत झाल्याने या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या भूसंपादनासाठी जागेचे मुल्यांकन येत्या सात दिवसांत पूर्ण केले जाईल, त्यानंतर महिन्याभरातच याबाबतचे आवॉर्ड घोषित करून भरपाईची रक्कम दोन महिन्यात बाधित शेतकऱ्यांना दिली जाईल, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.

हातकणंगलेत फ्लाय ओव्हर; सात ठिकाणी भुयारी मार्ग

          चोकाक ते अंकली फाटा या दरम्यान हातकणंगलेत फ्लाय ओव्हर उभारला जाणार आहे; तर या मार्गावर सात ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत. सध्या हा महामार्ग 35 मीटर रुंदीचा आहे. तो आता काही ठिकाणी 45 मीटर तर काही ठिकाणी 48 मीटर रुंद होणार आहे. या संपूर्ण मार्गावर नव्याने क्राँकीटीकरण केले जाणार आहे.
Tags: