कराटेमध्ये श्रुतिका पौळचे राष्ट्रीय पातळीवर सुवर्णयश
नव कृष्णा व्हॅली स्कूल, कुपवाड एमआयडीसी येथील इयत्ता नववीत शिक्षण घेणारी कु. श्रुतिका कृष्णा पौळ हिने कराटे या खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हा ते राष्ट्रीय पातळीवर सुवर्णयश संपादन केले आहे.
सदर वर्षी मिरज येथील क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या सांगली जिल्हास्तरीय शासकीय शालेय कराटे स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटातील ६८ किलो वजन गटात तिने प्रथम क्रमांक मिळवून आपल्या यशाची सुरुवात केली. त्यानंतर सांगली येथील तरुण भारत स्टेडियममध्ये झालेल्या विभागीय स्पर्धेतही तिने अव्वल क्रमांक पटकावला.
या यशाच्या जोरावर तिने बारामती येथील क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत सहभाग घेत प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. पुढे बारामती पोलीस मुख्यालय येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही श्रुतिकाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.
नव कृष्णा व्हॅली स्कूल हे नेहमीच क्रीडा क्षेत्रासाठी प्रसिद्ध असून, श्रुतिकाने आपल्या मेहनतीच्या जोरावर शाळेचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर वाढवला आहे.
तिला प्रशिक्षक यासीन झांबरे व श्रीधर चिखलगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष प्रवीण लुंकड अध्यक्ष सुरजफाउंडेशन, संगीता पागनीस डायरेक्टर सुरज फाउंडेशन, प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम, विनायक जोशी स्पोर्ट्स इन्चार्ज, सुशांत सूर्यवंशी क्रीडा शिक्षक आणि तिचे पालक कृष्णा पौळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
श्रुतिका दररोज दोन ते तीन तास नियमित सराव करत असून, आतापर्यंत तिने अनेक जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. तसेच दिल्ली येथे झालेल्या फेडरेशन नॅशनल स्पर्धेत सीबीएससी स्कूलमार्फत प्रतिनिधित्व केले आहे.
चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्याचा तिचा निर्धार असून, या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

