भाव,भक्ती आणि संगीत याला वय नसतं, हे सिद्ध करत 'जेन झी' हे बिरुद मिरवणाऱ्या तरुणाईनेच 'कलाग्राम 2026' या कला महोत्सवातील पुरुष गटासाठी आयोजित करण्यात आलेली संगीत भजनी स्पर्धा गाजवली. माऊली भजनी मंडळ, खोची या संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पारंपारिक कला प्रकारांना संजीवनी मिळावी , या उद्देशाने प्रा.डॉ.पी.बी.पाटील यांच्या 94 व्या जयंतीनिमित्ताने संचालक गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कलाग्राम 2026 या महोत्सवात काल पुरुष गटातील भजनी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत उपळावी, सोनी, बिसूर, आळते, खानापूर, आरवडे, खोची, आंधळी आदी सांगली जिल्ह्यातील विविध भागांबरोबरच सातारा, कोल्हापूर व कर्नाटकातील पुरुष भजनी मंडळांनी सहभाग घेतला. टाळ, मृदुंग, तबला, पेटीच्या सहाय्याने अत्यंत सुरेल अशी भजने , गवळणी सादर करण्यात आल्या. 10 वर्षे वयोगटापासून अगदी 80 वर्षाच्या ज्येष्ठ मंडळींचाही सहभाग असणाऱ्या या भजनी मंडळांमध्ये तरुण वर्गाचा लक्षणीय सहभाग होता. नेहमीच आधुनिकतेचा उदो उदो करणाऱ्या तरुणाईने या संगीत भजनी स्पर्धांच्या माध्यमातून मात्र पारंपारिकतेची कास न सोडल्याचे सिद्ध केले.
भार्गवराम सपकाळ - कुचि, कवठेमहांकाळ, अभयकुमार पोतदार, हातकणंगले व किरण चव्हाण, तांदूळवाडी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
- प्रथम-माऊली भजनी मंडळ, खोची
- द्वितीय - कला स्पंदन युवा भजनी मंडळ, विहे- पाटण तृतीय- राजा पंढरीचा संगीत भजनी मंडळ ,निपाणी- कर्नाटक
- उत्तेजनार्थ प्रथम - श्री स्वामी समर्थ युवा भजनी मंडळ, कराड
- उत्तेजनार्थ द्वितीय- गुरुमाऊली भजनी मंडळ, उपळावी
