मिरज-बेडग रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम
मिरज-पंढरपूर लाईनवरील सलगरे, बेळकी, शिपुर, आरग, बोलवाड रोड येथील अंडरग्राऊंड ब्रिजच्या रस्त्यावरील साचलेल्या पाण्याचा निपटारा होणार
मिरज-सांगली रस्त्यावरील कृपामयी जवळील रेल्वे ब्रिजला समांतर रेल्वे ब्रिज होणार
रेल्वे प्रशासनाच्या मोकळ्या जागांचे काँक्रीटीकरण होणार
मिरज रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण जलद गतीने होणार
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच मिरजेचे विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठपुराव्याने मतदारसंघात प्रलंबित असलेली रेल्वे प्रशासनाची प्रलंबित कामे तातडीने सुरु होणार आहेत. मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर मान. धरमवीर मीना यांच्याशी मुंबई येथे आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी या कामांबाबत प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री ना. अश्विन वैष्णवजी यांच्याकडे पत्रव्यवहार करून व फोनवरून चर्चा करून पाठपुरावा केल्याने रेल्वे प्रशासनाची मिरज मतदारसंघातील प्रलंबित कामे तातडीने सुरु करण्याचे आदेश जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मिरज-बेडग रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाची ४२ कोटी रुपये मंजूर झाले असून हे काम तातडीने सुरु करण्याबाबत आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी धरमवीर मीना यांच्याशी चर्चा केली व नागरिकांना होणार त्रास लक्षात घेऊन सदरचे काम तात्काळ सुरु करण्याचे आदेश देत असल्याचे धरमवीर मीना यांनी आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे याना सांगितले.
मिरज-पंढरपूर रेल्वे मार्गावर सलगरे, बेळकी, शिपुर, आरग, बोलवाड रोड येथे असलेल्या अंडरग्राऊंड ब्रिजच्या रस्त्यावर पावसामुळे पाणी साठत आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी या सर्वानाच याचा प्रचंड त्रास होत असून त्यांचे हाल होत आहेत. सदर वस्तुस्थिती आ. खाडे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच याठिकाणी चार-पदरी रस्ता करण्यात यावा, दोन्ही बाजूस संरक्षक भिंती बांधण्यात याव्यात व पाण्याचा निचरा योग्य रीतीने होण्याची व्यवस्था करावी, तसेच पुलाच्या दोन्ही बाजूस काँक्रीटचा रस्ता करण्यात यावा अशी मागणी केली. यानंतर धरमवीर मीना यांनी याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचे व त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश सोलापूर डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना केले. त्यानुसार सोलापूरचे अधिकारी व स्टाफ यांनी तातडीने सलगरे येथे येऊन पाहणी देखील सुरु केली आहे. लवकरच येथील कामे केली जातील असे आश्वासन धर्मवीर मीना यांनी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे याना दिले आहे.
मिरज-सांगली रस्त्यावरील कृपामयी हॉस्पिटल जवळ असलेला रेल्वे ब्रिज अत्यंत जीर्ण झाला आहे. त्यावरून अवजड वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. अवजड वाहतूक या पुलावरून बंद करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. मात्र त्यासाठी या रस्त्यावर समांतर रेल्वे पूल बांधण्याची गरज आहे. यासाठी किमान ४-५ वर्षे कालावधी जाणार आहे. दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सध्या असलेल्या पुलाचे मजबुतीकरण करण्याबाबत आ. डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी १९ जानेवारी, २०२३ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री याना पत्र दिले आहे. व केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णवजी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार या पुलाचे तात्पुरत्या स्वरूपात मजबुतीकरण करून या पुलाची स्ट्रेंग्थ वाढविण्याची आ.खाडे यांची मागणी जनरल मॅनेजर यांनी मान्य केली असून लवकरच याचे काम सुरु होणार आहे.
मिरज रेल्वे स्थानक हे " मॉडेल स्टेशन " करण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच केली होती. मात्र अद्याप मिरज रेल्वे स्थानकावर नूतनीकरणाचे काम सुरु झाल्याचे दिसून येत नाही. मिरज रेल्वे जंक्शन हे कर्नाटक सीमेलगतचे अत्यंत महत्वाचे जंक्शन असल्याने दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करत असतात. या स्थानकावर प्रवासी, नागरिक याना योग्य त्या सुविधा मिळण्यासाठी व मध्य रेल्वेच्या आश्वासनानुसार " मिरज रेल्वे स्थानक " हे " मॉडेल जंक्शन "बनविण्यासाठी नूतनीकरणाचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी आ.डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी वेळोवेळी माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री तसेच मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली असून त्याचा पाठपुरावा केला आहे. या बैठकीत जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी मिरज रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम देखील जलद गतीने सुरु करण्यात येईल असे आ.डॉ.सुरेशभाऊ खाडे याना आश्वासन दिले आहे.
या व्यतिरिक्त रेल्वे प्रशासनाच्या अनेक ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागांचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी आ.खाडे यांनी धरमवीर मीना यांच्याकडे केली असून त्या अनुषंगाने लवकरच कार्यवाही करण्याची सूचना जनरल मॅनेजर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
मिरज-सांगली भागातील तसेच प्रामुख्याने मिरज मतदारसंघातील महत्वाची प्रलंबित कामे सुरु करण्याबाबतच्या मागणीची केंद्रीय रेल्वेमंत्री ना. अश्विन वैष्णवजी तसेच मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी दखल घेऊन कामे सुरु करण्याचे आदेश दिल्याबद्दल आ. डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी त्यांचे आभार मानले आहेत व समाधान व्यक्त केले आहे.