पांढऱ्या काठीमुळे दृष्टीहीनांना शारीरिक सुरक्षितता, आत्मविश्वास - जिल्हाधिकारी अशोक काकडे

Admin
By -




- पांढरी काठी दिनानिमित्त दिला अंध व्यक्तिला आधार

पांढरी काठी दृष्टीहीनांसाठी चलनवलन व मार्ग शोधण्याचे एक साधन आहे. पांढरी काठी ही काठीधारकाला समोरील धोका, अडथळा यापासून सतर्क करते तर सामान्य लोकांना ती वापरणारा हा दृष्टीहीन आहे याची जाणीव करुन देते. यामुळे दृष्टीहीनांना शारीरिक सुरक्षितता, आत्मविश्वास, मानसिक शांतता मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त विश्रामबाग चौक सांगली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हधिकारी महोदयांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे, नॅब संस्थेचे अध्यक्ष बन्शीलाल ओत्सवाल, उपाध्यक्ष प्रा.उदय माने, निधी संकलन अधिकारी सतिश पाठारे, नेत्रतज्ञ डॉ. नेमिनाथ खोत आदि उपस्थित होते.

जगभरात प्रत्येक वर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक पांढरी काठी' दिन म्हणून साजरा केला जातो. पांढरी काठी ही धारकासाठी दया मागत नाही तर साधारण मदतीची अपेक्षा करते. पांढरी काठी ही दृष्टीधारकांना अंध व्यक्तीस चलनवलन करताना मदत करण्याचा संदेश देते. तसेच ती अंधांसाठी नसून दृष्टीधारकांना पांढऱ्या काठीचा बोध होण्यासाठी आहे, हा संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अंध बांधवांना रस्ता ओलांडण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. जागतिक पांढरी काठी दिनाच्या अनुषंगाने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड जिल्हा शाखा सांगली व नॅब आय हॉस्पिटल मिरज यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमामुळे अंध व्यक्तींना एक व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आणि संस्थेच्या कामाचे कौतुक करून, समाजाने अंध बांधवांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी इ. 10 चा विद्यार्थी प्रज्ज्वल कुंभार याने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती सांगून वाचन प्रेरणा दिनानिमित्त ब्रेल रुपांतरीत ," दशसुत्री " या पुस्तकाचे वाचन केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

नॅबच्या वतीने केले हे आवाहन
पांढरी काठीधारी रस्ता ओलांडत असेल तर आपली गाडी थांबवावी. अंधांना प्रथम जाऊ द्यावे. सिग्नल जवळ रस्ता पार करताना अंधांना मदत करावी. मदत करताना तुमचा हात कोपराजवळ त्यांना पकडू द्यावा. हळू चला, ओढू नका, ढकलू नका, डावी-उजवी योग्य दिशा सांगा. अंधांना सोडून जाताना त्यांना तसे सांगून जावे, न बोलता जावू नये.

कार्यक्रमास नँब आय हॉस्पिटलचे व्यवस्थापक फैय्याज मुश्रीफ, सुलेमान पटेल, रेहाना अत्तार, अंध शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला हिरेकुडी, वसतीगृहाच्या अधिक्षिका स्वाती शेळके, अरुणोदय पै उपस्थित होते.