सांगली येथे बुधवारी ''मानसिक आजार, आरोग्य आणि आपण" या विषयावर कार्यशाळा.

Admin
By -
2 minute read



सांगली येथे बुधवारी ''मानसिक आजार, आरोग्य आणि आपण" या विषयावर कार्यशाळा.
- जेष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ.अरुण रुकडीकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
- डॉ. हमीद दाभोलकर प्रमुख वक्ते.

      मित्र सामाजिक प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी 23 एप्रिल रोजी प्रा. चारुदत्त भागवत यांच्या जन्मदिवस निमित्ताने विविध सामाजिक विषयांवर आधारित एक कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी 23 एप्रिल रोजी "मानसिक आजार, आरोग्य आणि आपण" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा हॉटेल पर्ल, विजयनगर, सांगली येथे होणार आहे.

       आजच्या काळात आजूबाजूला असलेले मोबाईल आधारित बैठी जीवनशैली, एका बाजूला खूप उन्माद आणि एकीकडे नैराश्य, चिंता, भीती किंवा अनेक प्रकारचे तणाव यामुळे मानसिक आरोग्य बिघडत आहे, याची जाणीव अनेकांना नसते. या नव्याने निर्माण झालेल्या समस्या आणि आपले मानसिक आरोग्य या विषयावर या वर्षीच्या कार्यशाळेत चर्चा घडवून आणावी असे आम्हाला तीव्रतेने वाटले. म्हणूनच 'मनोवेध : वेध आरोग्याचा' हे यावर्षीच्या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. 

'.       मानसिक आजार, आरोग्य आणि आपण' या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर बोलणार आहेत. कार्यशाळा दोन सत्रात आयोजित केली आहे. या दोन सत्रात कपिल लळित - मानसिक आरोग्य आणि भावनिक शिक्षणाचे महत्त्व; डॉ.चारुदत्त कुलकर्णी (मानसोपचार तज्ज्ञ) - आत्महत्या: आधी आणि नंतर; आणि डॉ. प्रदीप पाटील  - मानसिक आरोग्य आणि विवेकनिष्ठ विचारांचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा ज्येष्ठ साहित्य समीक्षक प्रा.अविनाश सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. कार्यशाळा सकाळी 10 वा. सुरू होऊन 4 वा. संपन्न होईल. 

         सदर कार्यशाळेत डॉ. अरुण रुकडीकर आणि डॉ. मेरी रुकडीकर लिखित 'मेंटल डिसऑर्डर अँड यू ' या पुस्तकाच्या मराठी 'मानसिक आजार, आरोग्य आणि आपण ' आवृत्तीचे प्रकाशन केले जाईल. मराठी भाषांतर चारुदत्त भागवत आणि कल्पना चारुदत्त यांनी केले आहे. या प्रसंगी सौ.स्नेहा पेंढे जकाते पुस्तक परिचय करतील. सदर पुस्तक लिहिण्यामागची भूमिका समजावून घेण्यासाठी कन्या महाविद्यालय, मिरज येथील मानसशास्त्र विषयाचे प्रा. रमेश कट्टीमणी डॉ. अरुण रुकडीकर यांची मुलाखत घेतील. मानसिक आजारसंदर्भात वैशाली देशमुख अनुभव कथन करतील.

      आपल्या मानसिक समस्या आणि मानसिक आरोग्यासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचा इच्छुक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन 'मित्र सामाजिक प्रतिष्ठान तर्फे करण्यात येत आहे. सभासद नोंदणी अर्ज ऑनलाईन भरावयाचा आहे. अर्ज भरण्याची मुदत 21 एप्रिल 2025 पर्यंत आहे. नोंदणी विनाशुल्क आहे.

*कार्यशाळेच्या नांवनोंदणीची लिंक..*
https://forms.gle/ZqqHKffBETWoYML28