रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

Admin
By -



        महापालिकेच्या प्रभाग दोन अंतर्गत येत असलेल्या माजी सैनिक वसाहत ते सह्याद्री नगर, सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी, अस्वले कॉलनी ते विद्यानगर, सावळी रोड शासकीय कॉर्टर्स ते विद्यानगर या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. तेव्हा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या मिरज येथील कार्यालयासमोर दिगंबर जाधव व सागर वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली भागातील नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
          माजी सैनिक वसाहत, सह्याद्रीनगर, अस्वले कॉलनी, विद्यानगर या भागातील मुख्य रस्ते गेल्या अनेक वर्षापासून झालेले नाहीत. रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. रस्त्यावर कायम धुळीचे साम्राज्य आहे. रस्ते अस्तित्वहीन झालेले आहेत. त्यामुळे भागातील नागरिकांना, लहान मुलांना, वृद्धांना, महिलांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.
          त्याचप्रमाणे मिरज शहरातील बहुतांश वर्ग रोजगारासाठी मिरज औद्योगिक वसाहतमध्ये जात असताना याच रस्त्यांचा वापर करीत असतात. त्यामुळे त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणाला आमदार इद्रिस नायकवडी यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रा. मोहन वनखंडे, माजी नगरसेविका सौ. अनिता वनखंडे उपस्थित होते. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी सदर रस्त्यांची महापालिकेमार्फत पाहणी करण्यात आली असून कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. येत्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात 95 लाखापर्यंत तरतूद करण्यात येणार असून त्यानंतर कामे लगेच सुरू करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले लाक्षणिक उपोषण मागे घेतले.