◆ हभप तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचे लक्षवेधी आंदोलन; काळी दिवाळी केली साजरी
26 कोटींचा निधी उपलब्ध आहे. सहा महिन्यात काम मार्गी लावून जत पूर्व भागातील अंकलगी तलावात म्हैसाळचे पाणी सोडू असे आश्वासन अनेकवेळा जलसंपदा विभागाने दिले पण अजूनही पाण्याचा पत्ता नाही. वेळेत काम मार्गी लावले असते तर आज अंकलगी तलावात पाणी राहिले असते. प्रशासनाच्या उदासिनतेचा निषेध करत चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली अंकलगी ग्रामस्थांनी चक्क कोरडया तलावात काळी दिवाळी साजरी करत १००१ दिवे लावत अनोखे व लक्षवेधी आंदोलन केले.
यावेळी संत बागडेबाबा पाणी संघर्ष समिती अंकलगी, पुणे फ्रेंड्स मंडळ, वाल्मिकी युवक मंडळ, मॉर्निंग स्टार क्रिकेट मंडळ, शेतकरी संघटनेचे सिद्धाराम गुरव, मानव अधिकार पुणे जिल्हा संपर्कप्रमुख संजय धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जत तालुक्यातील गुड्डापूर, व्हसपेट, संख आणि अंकलगी या गावांसाठी तब्बल २६ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असतानाही संबंधित तलावांमध्ये पाणी सोडले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तलावात पाणी सोडावे, यासाठी अंकलगी ग्रामस्थांनी यापूर्वीही तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलने केली. मात्र वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली नाही. ऐन दिवाळीच्या सणात घराघरांत दिव्यांची रोषणाई सुरू असताना अंकलगीच्या कोरड्या तलावात मात्र १००१ दिवे लावून ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडली. पाण्याअभावी कोरड्या पडलेल्या तलावात दिवे लावण्याची वेळ दुष्काळग्रस्तांवर आली आहे. या आंदोलनातून प्रशासनाला पाणीप्रश्नाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी तुकाराम बाबा महाराज यांच्यासह ग्रामस्थांनी कोरड्या तलावात ठिय्या आंदोलन केले. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अंकलगी तलावात तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली.
■ तलावात करणार बेमुदत उपोषण- तुकाराम बाबा
मायथळ ते अंकलगी दरम्यान येणाऱ्या तलावात म्हैसाळचे पाणी सोडावे यासाठी आपला लढा सुरू आहे. केवळ काम संथ गतीने सुरू असल्याने तलावात पाणी पोहचू शकले नाही. पाण्यासाठी आपण अनेक आंदोलने केली. रक्त घ्या पण पाणी द्या म्हणून विनवणीही केली पण सरकारी काम आणि थांब अशी अवस्था आहे. अंकलगी तलावात पाणी सोडावे, काम पूर्ण करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी काळी दिवाळी साजरी केली आहे. आता तरी शासनाने लक्ष द्यावे अन्यथा लवकरच याच तलावात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
