सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सांगली जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय १४ वर्षांखालील टेबल टेनिस स्पर्धेत नव कृष्णा व्हॅली स्कूल, इंग्रजी माध्यमच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
या स्पर्धेत नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या मुलांनी सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळविले. आता त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, ही स्पर्धा २६ सप्टेंबर २०२६ रोजी रत्नागिरी, डेरवण येथे होणार आहे.
दररोजचा नियमित सराव, खेळातील सातत्य आणि शिस्तबद्ध तयारी यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. टेबल टेनिस प्रशिक्षक सूर्यकांत कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत आहे.
या यशाबद्दल प्रवीण लुंकड अध्यक्ष सुरज फाउंडेशन; श्रीशैल मोटगी सचिव, सुरज फाउंडेशन; प्रशांत चव्हाण प्रभारी प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम; विनायक जोशी स्पोर्ट्स इन्चार्ज सुरज स्पोर्ट्स अकॅडमी; सुशांत सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक; अशरफ शेख, क्रीडा शिक्षक यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, सांगली जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत नव कृष्णा व्हॅली स्कूलने मुलांच्या तसेच मुलींच्या गटातही चॅम्पियनशिप मिळवत शाळेच्या टेबल टेनिसमधील भरीव कामगिरीची नोंद केली आहे. यावेळी राजेंद्र आतनूर सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी व गौतम कुलकर्णी सचिव सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या.
