नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये खेलो इंडिया उपक्रमांतर्गत तीन दिवसीय राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन

Admin
By -




           सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने भारतीय खेल प्राधिकरणाच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत दिनांक 28 ते 30 ऑगस्ट 2026 दरम्यान तीन दिवसीय राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक जागरूकता निर्माण करणे, खेळाची आवड वाढविणे तसेच विद्यार्थ्यांना नियमितपणे मैदानाशी जोडणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
        तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नव कृष्णा व्हॅली स्कूल परिसरात विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ‘WE LOVE SPORTS’ हा आकर्षक सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला असून संपूर्ण परिसर क्रीडामय करण्यात आला आहे.
28 ऑगस्ट रोजी विविध क्रीडा कौशल्यांचे सादरीकरण
             दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात येणार आहे. त्यानंतर खेलो इंडिया उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांमधील 29 क्रीडा कौशल्ये व स्किल्स घेण्यात येणार आहेत.
           यामध्ये बास्केटबॉल ड्रिब्लिंग, व्हॉलीबॉल पासिंग, पुश-अप, अॅथलेटिक्स ABC रन-जंप-थ्रो, फुटबॉल लेग-बॉल पासिंग, क्रिकेट शॉट, स्विमिंग लेग एक्सरसाइज, सूर्यनमस्कार, रोप स्किपिंग तसेच स्कॉट यांसारख्या विविध क्रीडा कौशल्यांचा समावेश आहे.
          29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन
दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन विविध क्रीडा उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची व प्रेरणादायी यशोगाथेची माहिती देण्यात येणार आहे.
            यानंतर बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस, नेटबॉल, व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्स 100 मीटर, लगोरी तसेच रस्सीखेच अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध खेळांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून त्यांच्यामध्ये क्रीडा कौशल्य, संघभावना, शिस्त आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
30 ऑगस्ट रोजी सायकल रॅली व 400 मीटर धावणे
            दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी ‘Sunday on Cycle’ या संकल्पनेतून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये विद्यार्थी, पालक, बाहेरील खेळाडू, पोलीस कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. नव कृष्णा व्हॅली स्कूलपासून सुरू होणारी ही रॅली भारत सूतगिरणी, कुपवाडपर्यंत साधारण चार किलोमीटर अंतराची असणार आहे.
          याच दिवशी ‘Run India, Fit India’ या संकल्पनेनुसार नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या मैदानावर विद्यार्थ्यांसाठी 400 मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. मान्यवरांच्या हस्ते शर्यतीला सुरुवात करण्यात येणार असून विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येणार आहे.
          या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवासाठी संस्थेचे संस्थापक प्रवीण लुंकड अध्यक्ष सुरज फाउंडेशन,श्रीशैल मोटगी सचिव सुरज फाउंडेशन,संगीता पागनीस डायरेक्टर सुरज फाउंडेशन तसेच नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या प्राचार्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अधिकराव पवार मुख्याध्यापक नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम, विनायक जोशी स्पोर्ट्स इन्चार्ज, प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल, सुशांत सूर्यवंशी व अशरफ शेख क्रीडा शिक्षक तसेच रिलेश मुंगले साई प्रशिक्षक यांचे सहकार्य लाभत आहे.
           खेलो इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळाकडे आकर्षित करून त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये आयोजित करण्यात येणारा हा तीन दिवसीय राष्ट्रीय क्रीडा दिन महोत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Tags: