सांगली, दि. 9 सध्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत सर्वसाधारणपणे सर्वच पेट्रोल पंपावर अतिरीक्त स्वरुपामध्ये वाहनांमध्ये इंधन साठा करण्यासाठी गर्दी होऊन पेट्रोल पंपावर वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर सांगली जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असून इंधन पुरवठा सुरळीत सुरु आहे. सर्वच पेट्रोल पंप कंपनीच्या विक्री अधिकारी / प्रतिनिधी यांना प्रशासनाच्या मार्फत इंधन पुरवठा सुरळीत ठेवणेकामी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे,.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, सांगली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नाही. सर्व पेट्रोल पंपावर नियमितपणे इंधनाचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करणे योग्य होणार नाही. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
