सांमिकु महापालिकेत पाणीपुरवठा आढावा बैठक; जबाबदाऱ्या निश्चित करण्याच्या महापौरांच्या सूचना

Admin
By -



              सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका येथे मा.महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. शहरातील सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

           बैठकीत महापौरांनी महापालिका क्षेत्रात होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रक, दाब, गळती, दुरुस्ती कामे तसेच नागरिकांकडून प्राप्त तक्रारी याबाबत माहिती घेतली. पाणीपुरवठा विभागाकडील पाईप इन्स्पेक्टर व व्हॉलमन यांच्यावर स्पष्ट जबाबदाऱ्या निश्चित करून दैनंदिन कामकाजाचे सुयोग्य व नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले.

        शहरातील प्रत्येक प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत व वेळेवर होण्यासाठी नियमित पाहणी, गळती शोध मोहीम, तसेच तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या. पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

         नागरिकांना स्वच्छ, पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी असून, त्यासाठी विभागाने समन्वय साधून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन मा.महापौरांनी यावेळी केले.
Tags: