स्पर्धा अभिलेखे १० मार्चपर्यंत सादर करण्याचे आवाहन
कोल्हापूर - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार संबंधित खेळ संघटनांनी विविध स्तरांवर आयोजित केलेल्या स्पर्धांचे अधिकृत अभिलेख जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
तथापि, अनेक एकविध क्रीडा संघटनांकडून संबंधित स्पर्धांचे अभिलेख केवळ क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्याकडे सादर केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या खेळाडूंच्या क्रीडा गुणांसाठीच्या प्रस्तावांची पडताळणी करणे व पात्र खेळाडूंना क्रीडा गुणांची शिफारस करणे अडचणीचे ठरत आहे. परिणामी, पात्र असूनही अनेक खेळाडू विद्यार्थी क्रीडा गुण सवलतीपासून वंचित राहत आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व एकविध क्रीडा संघटनांनी सन २०२५-२६ या वर्षात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे संपूर्ण अभिलेख दि. १० मार्चपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
संघटनांनी प्रस्तावासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र (१८६० व १९५० च्या अधिनियमानुसार), राज्य संघटनेचे संलग्नता पत्र, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा सविस्तर अहवाल तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे अहवाल (सहभागी संघ व खेळाडूंची यादी, भाग्यपत्रिका/लॉट्स व अंतिम निकाल) ही कागदपत्रे अनिवार्यपणे जोडावीत.
पात्र खेळाडू विद्यार्थी क्रीडा गुणांपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेणे ही संबंधित संघटनांची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व एकविध क्रीडा संघटनांनी आपल्या क्रीडा स्पर्धांचे अभिलेख हस्तेपोच दि. १० मार्चपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
