सुरज फाउंडेशन येथे राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेतील ११ व १३ वर्षांखालील खेळाडूंचा बक्षीस समारंभ उत्साहात

Admin
By -


       आयसीआयसीआय बँकेचे रिजनल मॅनेजर साईनाथ गायकवाड डॉक्टर सुरेश माने आधी व्याख्याता शिक्षण विभाग यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंचा गौरव

          महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने सुरज फाउंडेशन, कुपवाड एमआयडीसी आणि सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेतील ११ व १३ वर्षांखालील मुले-मुलींचा बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला. आयसीआयसीआय बँकेचे रिजनल मॅनेजर साईनाथ गायकवाड, शाखा व्यवस्थापक हेमंत रायगुडे, अजिंक्य कुलकर्णी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सांगलीचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. सुरेश माने, चेंबर ऑफ कॉमर्सचे व्यवस्थापक अमोल पाटील, कृष्णा व्हॅली क्लबचे व्यवस्थापक किशोर दाभाडे आणि बन्सी काका ओस्तवाल यांच्या उपस्थितीत गुणवंत खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
          या वेळी सुरज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण लुंकड, सचिव श्रीशैल मोटगी, स्पोर्ट्स इनचार्ज विनायक जोशी, गौरव पणेकर यांच्यासह स्पर्धेचे आयोजक, पंच, प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते.
          ११ वर्षांखालील मुलींच्या गटात रिद्धी सिंग, तर मुलांमध्ये राजवर्धन तिवारी विजेते
११ वर्षांखालील मुलींच्या गटात ठाण्याच्या रिद्धी सिंग हिने विजेतेपद पटकावले, तर पुण्याच्या शरण्य पटवर्धन हिने उपविजेतेपद मिळविले. उपांत्य फेरीत पुण्याची एरिना अहमद आणि ठाण्याची धडककन तन्ना यांनी स्थान मिळविले.
११ वर्षांखालील मुलांच्या गटात सोलापूरच्या राजवर्धन तिवारी याने विजेतेपद मिळविले. ठाण्याच्या अधिराज चौहान याने उपविजेतेपद पटकावले. पुण्याचा नक्ष महाजन आणि कोल्हापूरचा शुभंकर जाधव हे उपांत्य फेरीतील खेळाडू ठरले.
        १३ वर्षांखालील मुलींच्या गटात रुहिका वाणी विजेती
       १३ वर्षांखालील मुलींच्या गटात ठाण्याच्या रुहिका वाणी हिने विजेतेपद पटकावले, तर ठाण्याच्याच जिन्या वधान हिने उपविजेतेपद मिळविले. पुण्याची एरिना अहमद आणि ठाण्याची सिद्धी इंगळे यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.
१३ वर्षांखालील मुलांमध्ये राजवर्धन तिवारीची बाजी
         १३ वर्षांखालील मुलांच्या गटात सोलापूरच्या राजवर्धन तिवारी याने विजेतेपद मिळविले, तर पुण्याच्या वरदान कोलते याने उपविजेतेपद पटकावले. पुण्याचा निरज नांदेडे आणि मुंबई शहराचा अव्यान वालिया यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळविले.
           राज्यातील सुमारे ७०० खेळाडूंचा सहभाग
ही स्पर्धा १४ ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नव कृष्णा व्हॅली स्कूल, कुपवाड एमआयडीसी, सांगली येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील सुमारे ७०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ११, १३, १५, १७ व १९ वर्षांखालील मुले-मुली तसेच १९ वर्षांवरील महिला व पुरुष अशा विविध गटांमध्ये सामने खेळविण्यात येत आहेत.
            बक्षीस वितरणप्रसंगी मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करून सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात मोठे यश मिळविण्याचे आवाहन केले. लहान वयोगटातील खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धांमधून अनुभव मिळतो आणि भविष्यातील सक्षम खेळाडू घडण्यास मदत होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
              पंच प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच टेबल टेनिसच्या विकासासाठी लेव्हल वन व लेव्हल टू पंच प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे प्रशिक्षित पंच आणि तांत्रिक अधिकाऱ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
            क्रीडा क्षेत्रातील सुरज फाउंडेशनचे योगदान
           सुरज फाउंडेशन आणि नव कृष्णा व्हॅली स्कूल यांच्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आणि खेळविकासाचे उपक्रम सातत्याने राबविले जातात. खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, स्पर्धात्मक वातावरण आणि गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा भर आहे.
          ही स्पर्धा १८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून सांगली जिल्ह्यातील शाळांनी विद्यार्थ्यांसह स्पर्धेला भेट द्यावी, सामने पाहावेत आणि विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags: