- ICAR-NBAGR कडून ॲक्सेशन नंबर प्रदान;
- तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश
- सांगली व परिसरातील मेंढीपालकांसाठी सुवर्णकाळ
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उगम पावलेल्या आणि आपल्या धिप्पाड शरीरासाठी व जलद वाढीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'माडग्याळ' मेंढीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो (NBAGR), कर्नाल द्वारे माडग्याळ मेंढीला 'स्वतंत्र देशी मेंढी जात (New Indigenous Breed) म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ICAR च्या १४ व्या 'ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटी'च्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याबाबतचे अधिकृत पत्र ICAR-NBAGR चे संचालक डॉ. एन. एच. मोहन यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन आयुक्तांना पाठवले आहे.
यासंदर्भात जिल्हा उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी आनंद व्यक्त करून दिलेली प्रतिक्रिया अशी – जत तालुक्यातील सिद्धनाथ खोरे, माडग्याळ तसेच, आटपाडी तालुका तसेच कवठेमहांकाळ तालुक्याच्या काही भागात वर्षानुवर्षे मेंढीपालन केले जाते. माडग्याळ जात म्हणून मान्यता मिळाल्यामुळे मेंढीपालन व्यवसायास उभारी मिळून शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या मान्यतेकरिता पशुसंवर्धन विभाग गेले तीन वर्षे प्रयत्नरत असून, तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
माडग्याळ मेंढीचे वैशिष्ट्य
माडग्याळ मेंढी ही तिच्या लांब व उंच शरीरयष्टी, वैशिष्ट्यपूर्ण बाकदार नाक (रोमन नोज), लांब कान आणि जलद वजन वाढण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी व लगतच्या भागात या मेंढीचे संगोपन मोठ्या प्रमाणावर केले जाते. कमी पाण्यात व प्रतिकूल हवामानात टिकून राहण्याची अफाट क्षमता हे या प्रजातीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
स्वतंत्र 'ॲक्सेशन नंबर' मिळाल्यामुळे आता या प्रजातीचे संवर्धन वैज्ञानिक पद्धतीने केले जाईल. संकरित प्रजननामुळे मूळ जात नष्ट होण्याचा धोका टळेल. हा प्रमुख फायदा
