नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम (सुरज फौंडेशन संचलित) येथे शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत दिमाखात व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या आनंदी चेहऱ्यांनी, पालकांच्या टाळ्यांच्या गजराने आणि मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच खुलली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डबल महाराष्ट्र केसरी विजेते, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे संस्थापक व माजी सदस्य जिल्हा परिषद सांगली मा. चंद्रहार पाटील तसेच महाराष्ट्र अंडर-19 क्रिकेट संघाचे कर्णधार कु. सह्याद्री कदम उपस्थित होते. यावेळी सुरज फौंडेशनचे क्रिकेट कोच व भारतीय संघातील खेळाडू श्री. अभिजीत बाळासो कदम तसेच क्रीडा शिक्षिका. सौंदर्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. अधिकराव पवार होते. एडमिन ऑफिसर श्री. रघुनाथ सातपुते उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापकांनी केले.
शाळेची यशस्वी वाटचाल
प्रास्ताविकात मुख्याध्यापकांनी सांगितले की, केवळ 13 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या शाळेने आज 400 विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वी मजल मारली आहे. गेली 30 वर्षे संस्था शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा प्रगती आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहे.
सह्याद्री कदम यांचे प्रेरणादायी मनोगत
कु. सह्याद्री कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “यश एका दिवसात मिळत नाही; त्यामागे सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि गुरुजनांविषयी आदर या तीन गोष्टी अत्यावश्यक असतात.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य दिशा व प्रोत्साहन मिळाल्यास ते मोठी कामगिरी करू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
मा. चंद्रहार पाटील यांचे प्रभावी व प्रेरणादायी भाषण
मा. चंद्रहार पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून अत्यंत प्रेरणादायी व अट्रॅक्टिव्ह मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले,
“मी स्वतः ग्रामीण भागातून आलो आहे. संघर्ष, अपयश आणि कठोर सराव या गोष्टी माझ्या आयुष्याचा भाग होत्या. पण एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवले — ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचे. त्या ध्येयासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. यश मिळवायचे असेल तर मोबाईल, विचलन आणि अनावश्यक गोष्टींपासून दूर राहून आपल्या स्वप्नावर लक्ष केंद्रित करा.”
ते पुढे म्हणाले, “पालकांचा विश्वास, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि स्वतःवरील आत्मविश्वास या तीन गोष्टी असतील तर कोणतीही उंची गाठता येते. अपयश हे शेवट नसून ते पुढील यशाची सुरुवात असते.”
त्यांच्या या प्रभावी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले व सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमले.
गुणवंतांचा गौरव
शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या व आदर्श विद्यार्थी म्हणून कु. अनुष्का भिमराव रुपनर हिचा विशेष सन्मान करण्यात आला.
प्राथमिक विभागातील आदर्श खेळाडू म्हणून कु. संस्कार शीतल भोरे व कु. माहि महेश पवार, तर माध्यमिक विभागातून कु. युवराज प्रकाश मोरे व कु. अनुष्का आप्पासो बंडगर यांना गौरविण्यात आले.
तसेच विविध बौद्धिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्र. युवी जेशस्तीपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
विशेष सत्कार
सुरज फौंडेशनचे क्रिकेट कोच व भारतीय संघातील खेळाडू श्री. अभिजीत बाळासो कदम यांची सीनियर भारतीय संघात निवड होऊन आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ विजेता ठरल्याबद्दल तसेच महाराष्ट्र राज्य वेटनर असोसिएशनच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल प्रमुख अतिथी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
पालक प्रतिनिधी यांचा सत्कार सहाय्यक शिक्षिका सौ. सुनीता चौगुले यांनी केला. क्रीडा शिक्षिका . सौंदर्या पाटील यांचाही शाळेतील क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
तासगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक २ मधून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या सौ. रोहिणी विनोद धोत्रे यांचाही मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती
यावर्षी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले. संपूर्ण सभागृहात अभिमान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनीता भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. सुनीता चौगुले यांनी मानले. विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
संस्थेचे संस्थापक श्री. प्रवीणजी लुंकड यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, खेळाडू व शिक्षकांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


