विरोधक म्हणतात,मी ३६ वर्षात काय केले? मी काय केले,ते जनतेला माहीत आहे. या शहरात जे - जे उभा राहिले,ते आम्हीच उभा केले. विरोधकांनी या शहरात एखादी तरी इमारत उभा केली का? मला आपल्या शहरातील गल्लीबोळात फिरायला काहीही वाटत नाही. मी सर्वत्र फिरतो, नागरिकांशी संवाद करतो,प्रश्न समजून घेतो. कारण हे शहर मलाच पुन्हा दुरुस्त करायचे आहे. तुम्ही आमच्या उमेदवारांना विजयी करा,या शहराच्या विकासाला पुन्हा चालना देऊन या शहराचा पुन्हा राज्यात नावलौकिक करू,असा विश्वास माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी उरुण ईश्वरपूर येथील जाहीर सभेत व्यक्त केला.
सत्ता असो - नसो राज्य सरकार कडून विकास कामाला निधी कसा आणायचा हे मला चांगलं कळत,असा टोलाही त्यांनी दिला.
येथील यल्लाम्मा चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते दिलीपराव पाटील,युवा नेते प्रतिकदादा पाटील,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे,प्रा.शामराव पाटील,माजी नगराध्यक्ष भगवान पाटील,मुनीर पटवेकर,अरुणादेवी पाटील,देवराज पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,खंडेराव जाधव,सुरेंद्र पाटील, काँग्रेस पक्षाचे ॲड.मनिषा रोटे,राजेंद्र शिंदे,शाकीर तांबोळी,नंदकुमार कुंभार,आकिब जमादार, शिवसेना (उबाठा) चे मानव गवंडी,बळीराज शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे,उत्तम चांदणे, प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,आम्ही आमच्या जाहीर नाम्यात शास्तीकर माफ करण्याचे अभिवाचन दिले,अनेक वेळा बोललो. आज मुख्यमंत्री साहेबांनी निवडणुकी नंतर शास्तीकर रद्द करण्या ची घोषणा केली आहे. या शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक अतिरिक्त पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा करीत आहोत. सत्ता नसली, तर राज्य सरकारकडून निधी कसा आणायचा हे मला चांगले माहित आहे.
ते म्हणाले,खंडेराव जाधव यांनी आता काही व्हिडिओ दाखविले. मी उद्या तुम्हाला एक व्हिडिओ पाठवितो. यातून आनंदराव मलगुंडे यांचे मताधिक्य निश्चित वाढेल. आम्ही पूर्वी या शहरात चांगल्या सुविधा दिल्या,त्यातून हे शहर झपाट्याने वाढले. आम्ही २०१६ चा पराभव मान्य केला. मात्र विरोधकांना या शहराचा विकास करण्यात अपयश आले आहे. या शहरातील जनता बिघडलेले शहर दुरुस्त करण्यासाठी आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने विजयी करतील.
यावेळी त्यांनी विरोधी पॅनलमधील अनेक उमेवारां वर असणाऱ्या गुन्ह्यांची कलमे वाचून दाखवून या शहरात कोणती विकास कामे करणार,हे सविस्तर सांगितले.
दिलीपतात्या पाटील म्हणाले,आम्ही तरुण शिकलेली,सुसंस्कृत उमेदवार उभा केले आहेत. मात्र विरोधी बाजूला कोण उमेदवार आहेत बघा. विरोधकांनी या शहराची संस्कृती बिघडविली आहे. आपण सर्वांनी आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी करून शहराच्या विकासाला चालना द्यावी. यावेळी त्यांनी विरोधकांच्यावर चौफेर हल्ला चढविला.
आनंदराव मलगुंडे म्हणाले,आम्ही गेल्या वेळी जनतेचा कौल मान्य करून सत्ताधारी मंडळींना विकासात सहकार्य केले. मात्र त्यांना शहराचा विकास करण्यात पूर्ण अपयश आले आहे. पालकमंत्री म्हणतात,चोवीस बाय सात व भुयारी गटारीस मोठा निधी दिला आहे. त्यांनी ते दाखवून द्यावे,नाव बदलतो. ते म्हणतात,मला मुंबईला जायला जमेल का? आमचे नेते निधी आणायला समर्थ आहेत,तुम्ही चिंता करू नका.
खंडेराव जाधव म्हणाले,आमच्याकडून तिकडे गेलेले साहेबांच्या कामाचे कौतुक आणि विरोधकांच्या भोंगळ कारभारावर प्रखर टीका करत होते. यावेळी त्यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत अँड चिमण डांगे यांचे अनेक व्हीडीओ मोठ्या पडद्यावर दाखविले.
यावेळी शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील,अरुण कांबळे, गणेश शेवाळे,पुष्पलता खरात,रोझा किणीकर यांचीही भाषणे झाली. याप्रसंगी विजयराव पाटील,महेश पाटील,एल.एन. शहा,संग्राम पाटील, विजय कुंभार,ॲड.धैर्यशील पाटील, सुभाषराव सूर्यवंशी,दादासाहेब पाटील, शिवाजी वाटेगावकर, बाळासाहेब पाटील,सुस्मिता जाधव,सुनिता जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते,उमेदवार व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी संचालक शैलेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी उप नगराध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी आभार मानले.

