..
मंगळवार २२ रोजी सायंकाळी तालुक्यातील आरग व परिसरात सोसाट्याचा वारा येऊन गारपीट झाली होती. यावेळी अंगावर वीज पडल्याने उदय विठ्ठल माळी, वय ३३, रा. आरग, ता. मिरज या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आज सोमवार दि २८ रोजी माजी पालकमंत्री व मिरजेचे आमदार डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी आरग येथे जाऊन माळी कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन करून त्यांची विचारपूस केली. झालेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले व माळी कुटुंबियांना मानसिक धीर दिला. तसेच या कुटुंबियांच्या पाठीशी आपण असून सर्वतोपरी मदत करू असे आ.खाडे यांनी सांगितले. घरातील कमावत्या तरुणाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांसाठी राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी माळी कुटुंबियांना दिले.
यावेळी कृषी अधिकारी सूर्यवंशी, प्रतीक पवार यांच्यासह आरग येथील माजी उपसरपंच सुभाष माळी, किरण पाटील, नारायण माळी, माजी उपसरपंच उत्तम पाटील, संजय नागठाणे यांच्यासह गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.