उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाला माझा पूर्ण पाठिंबा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची ग्वाही

Admin
By -





          मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे तातडीने स्थापन व्हावे या मागणीस माझा पूर्ण पाठिंबा आहे, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधी व न्याय खात्याचे मंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरही मी बोलीन असेही त्यांनी सांगितले.
                मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे अशी मागणी बरीच वर्षे केली जात आहे. या मागणीसंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भातच सांगली वकील संघटनेचे पदाधिकारी एडवोकेट भाऊसाहेब पवार आणि एडवोकेट किरण रजपूत यांनी आमदार गाडगीळ यांची भेट घेतली.
आमदार गाडगीळ यांनी सांगितले, या कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे.  एडवोकेट पवार म्हणाले, कोल्हापूर मध्ये तातडीने खंडपीठ होणे गरजेचे आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदि जिल्ह्यातील पक्षकारांच्या दृष्टीने ते अत्यंत सोयीचे आहे. त्या दृष्टीने तेथे जागा वगैरेंची  उपलब्धता आहे. तुर्त कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत खंडपीठाचे कामकाज सुरू करता येणे शक्य आहे. व्यापक विचार करून नवी जागा तसेच  इमारत आणि आवश्यक कर्मचारी वर्ग यासाठी शासनाची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे आता हा विषय शासनाच्या समोर प्रलंबित आहे.
 त्यावेळी आमदार गाडगीळ यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन  बोलण्याची ग्वाही दिली. तसेच कोल्हापूर येथील खंडपीठाच्या मागणीला पाठिंबा देणारे लेखी पत्रही त्यांनी एडवोकेट पवार आणि एडवोकेट राजपूत यांना दिले.