टीईटी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजनात्मक अंमलबजावणी काटेकोर करावी - जिल्हाधिकारी अशोक काकडे

Admin
By -






- महा-TET परीक्षा 2025 नियोजनाची बैठक संपन्न
- गोपनीयता आणि सुरक्षेची आवश्यक काळजी घेण्याचे निर्देश
- ⁠परीक्षार्थींचे मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने फ्रिस्किंग होणार 
          
            सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी टीईटी परीक्षेबाबत सूचनांचे व वेळेचे काटेकोर पालन करावे. परीक्षा  सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजनात्मक अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. सर्व संबंधित विभागांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज दिल्या.

             महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-TET) 2025 च्या संचालनाबाबत जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष विशाल नरवाडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा सनियंत्रण समितीचे सचिव मोहन गायकवाड आदि उपस्थित होते. 

              जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सर्व परीक्षा केंद्रावर सी.सी. टी.व्ही यंत्रणेचा वॉच असणार आहे. टीईटी परीक्षेबाबत जिल्हा संनियत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. प्रत्येक भरारी पथकात एक महिला कर्मचा-याचा समावेश करण्यात आला आहे.
परीक्षा केंद्रात प्रवेश करताना परीक्षेच्या कामकाजामध्ये कार्यरत असणा-या सर्व  परीक्षार्थी (दिव्यांग उमेदवारांचे लेखनिकासह) यांचे मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने frisking करावे, असे त्यांनी सूचित केले. 

             जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, परीक्षा कामकाजात कोणतीही दिरंगाई होऊ नये, तसेच परीक्षा कालावधीत गोपनीयता आणि सुरक्षेची आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी. परीक्षा झाल्यानंतर परीक्षा साहित्य जिल्हास्तरावर काळजीपूर्वक जमा करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

                मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी   परीक्षेच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, परीक्षा केंद्रावरील  नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांनी भ्रमणध्वनी  वापराबाबत तसेच दिलेली जबाबदारी   व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या.

              शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड म्हणाले, महा-TET परीक्षा 2025 चे संपूर्ण कामकाज व्हिडीओ रेकॉर्डिंग व सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली पारदर्शकपणे पार पाडण्यात येणार आहे. पारदर्शकता व विश्वासार्हता कायम ठेवून परीक्षा शिस्तबद्ध पध्दतीने घेण्यात येईल. परिक्षेसंबंधी चुकीच्या बातम्या, अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व httpe://mahatet.in  अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणा-या सूचना व माहितीचे अवलोकन करावे, असे ते म्हणाले.          
     
           शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपशिक्षणाधिकारी नागेश ठोंबरे यांनी आभार मानले. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी तसेच सर्व झोनल अधिकारी  सर्व केंद्र संचालक उपस्थित होते. 
 
Tags: