समाजासाठी काम करणाऱ्याना देखील विरोधाचा सामना करावा लागतो :- भास्करराव पेरे पाटील

Admin
By -



      समाजामध्ये काम करीत असताना चांगल्या माणसाची देखील परिक्षा घेतली जाते, पण या परिस्थितीत विचलीत न होता काम करीत राहणे चांगले आहे. कर्मवीर आण्णांना देखील या दिव्यातून जायला लागले होते. असे उद्गार भास्करराव पेरे पाटील यांनी काढले. कर्मवीर पतसंस्थेच्यावतीने आयोजित कर्मवीर आण्णांची १३८ वी जयंती सोहळयामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. रत्नाकर बँकेचे माजी चेअरमन श्री. अनिल पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर सुभाष कवडे व माजी प्राचार्य डॉ राजेंद्र कुंभार यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती.

        सुरुवातीला प्रमुख पाहुणे व संचालक मंडळाच्यावतीने दिपप्रज्वलन करुन कर्मवीर आण्णांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कर्मवीर पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी केले. कर्मवीर आण्णांनी उपेक्षितांना शिक्षणाची दारे उघडून त्यांचा उध्दार केला असून महाराष्ट्रावर आण्णांचे थोर उपकार आहेत असे त्या म्हणाल्या. कर्मवीर पतसंस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा त्यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतला. यावेळी भास्करराव पेरे पाटील यांचे स्वागत व्हा. चेअरमन अॅड. एस.पी. मगदुम यांनी केले.

           कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले यांनी दिली. यावेळी ट्रस्टच्यावतीने मुकबधीर मुलांच्या शाळेस रु. १ लाख, कर्मवीर आरोग्य अभियानास रु. २५ हजार, अर्चना सुनिल मगदूम यांच्या सामाजिक कार्यास रु. २५ हजार ची देणगी देण्यात आली तर कन्या शाळा उदगांव यांना शालेय साहित्य देण्यात आले.

        यावेळी बोलताना प्रा.डॉ. राजेंद्र कुंभार यांनी कर्मवीर आण्णांच्या सविस्तर कार्याचे विवेचन केले. ते म्हणाले सामान्याची शिक्षण चळवळ टिकवायची असेल तर आण्णांनी घालून दिलेला शिक्षणाचा आदर्श डोळयासमोर ठेवून काम केले पाहिजे. शिक्षणातून खरा विद्यार्थी घडविण्याचे काम झाले पाहिजे. तरच आण्णांना अभिप्रेत असलेला समाज आपल्याला घडविता येईल. यावेळी प्रा. सुभाष कवडे यांनीही कर्मवीर आण्णांच्या जीवनावर भाष्य करुन आण्णांचे कार्यावर प्रकाश टाकला.

       श्री. भास्करराव पेरे पाटील म्हणाले कि काम करण्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. लोकांना सवयी लावल्यामुळे चांगली कामे सहज उभी करता येतात याच उदाहरण आम्ही उभे केले आहे. खेडयाच्या सुबत्तेच्या वस्तु तिथेच निर्माण करता येतात. यातून समृध्दी येईल असे ही ते म्हणाले. पण चांगली कामे करताना देखील विरोधाचा सामना करावा लागतो, पण त्यामुळे न थांबता आपले कार्य पुढे चालू ठेवल्यानेच मोठे कार्य उभारता येईल असे प्रतिपादन भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या मुख्य मनोगतात केले. त्यांनी आपल्या खास शैलीने श्रोत्याने हसवत ठेवले.

        यावेळी मुकबधीर शाळेच्या वतीने मुख्याध्यापक घरपणकर सर तर कन्या शाळेच्यावतीने अध्यापिका अंजना ठेपे यांनी देणगीबद्दल आभार व्यक्त केले.

      अध्यक्षीय भाषणात मा. अनिल पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा गौरव केला. संस्थेने व्यवस्थापनामध्ये आधुनिकता आणली असून संस्थेचे कार्य नव्या जमान्यासोबत चालले आहे असे गौरवोदगार काढले.

       यावेळी कर्मवीर संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. एस.पी. मगदूम संचालक श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील डॉ अशोक आण्णा सकळे, डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ओ.के. चौगुले (नाना) डॉ. एस.बी. पाटील (मोटके), श्री आप्पासाहेब गवळी, श्री. बजरंग माळी, श्री. अमोल रोकडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे. श्री. लालासो भाऊसो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदुम उपस्थित होते. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. आभार कर्मवीर ट्रस्टचे कार्यवाह व संचालक डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील यांनी मानले. सुत्रसंचालक विनोद मगदुम सर यांनी केले.