सांगली ही चांगली व्हायला पाहिजे यासाठी सर्वांनी मिळून काम करूया. यासाठी सर्वांनी महापालिका प्रशासनाला साथ देऊया असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेत आयोजित आढावा बैठकीत केले.
आज महापालिकेत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आले होती. या बैठकीस आयुक्त शुभम गुप्ता, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 रविकांत अडसूळ, अतिरिक्त आयुक्त 2 निलेश देशमुख, उपआयुक्त वैभव साबळे यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेत सर्व विभागाच्या सुरू असणाऱ्या कामांचा आढावा घेत आमदार म्हणून महापालिकेला सर्वोपतरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी प्रभाग स्तरावर खाऊ गल्ली आणि भाजी पाला विक्री केंद्र उभारावे, शहरात महिलांसाठी जास्तीजास्त स्वच्छतागृह उभारावीत, अपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण करावेत. नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे यासह अनेक विषयाबाबत आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रशासनाला मौलिक सूचना केल्या. यावेळी महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राबाबत आमदार सुधीर गाडगीळ यांनी समाधान व्यक्त करीत अशा प्रकारची केंद्र नागरिकांना खूप मोलाची ठरत आहेत असे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले की, आमदार सुधीर गाडगीळ यानी केलेल्या सूचनेप्रमाणे अनेक ठिकाणी सुधारणा केल्या जातील तसेच सर्व अधिकारी कर्मचारी हेही या सूचनांचे पालन करतील असे सांगितले.
आढावा बैठकीचे आभार उपआयुक्त वैभव साबळे यानी मानले तर सूत्रसंचालन नकुल जकाते यांनी केले..