जोरदार शक्ती प्रदर्शनाने सुधीरदादांच्या प्रचाराची सांगता

Admin
By -







हजारोंच्या सहभागाने जल्लोषात ऐतिहासिक मोटारसायकल रॅली
सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या निवडणूक प्रचाराची आज जोरदार शक्ती प्रदर्शनाने सांगता झाली. 'न भूतो न भविष्यती 'असेच वर्णन करावे लागेल अशा या मोटार सायकल रॅलीत हजारोंचा सहभाग होता. मारुती चौकापासून निघालेल्या रॅलीचा विश्रामबागमधील श्री गणेश मंदिरासमोर समारोप झाला.त्यावेळी सुधीरदादा गाडगीळ म्हणाले,तुम्ही मला मतदानातून पाठबळ द्या ,माझी पुढची पाच वर्षे सांगलीच्या सेवेसाठी आहेत.
मारुती चौकातून सकाळी मोटारसायकल रॅलीला प्रारंभ झाला. त्यावेळी चौकात अक्षरशः जल्लोषाचे वातावरण होते. हजारो महिला, पुरुष मोटरसायकल सज्ज करून सुधीरदादांची वाट पाहत होते. सुधीरदादा गाडगीळ  यांची कटआउट अनेकांच्या हातात होती. एकच वादा सुधीरदादा, सुधीर दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा लिहिलेले फलकही अनेक जण गर्दीत उंचावत होते. पक्षाच्या टोप्या घातलेले आणि छातीवर कमळ चिन्हाचे बिल्ले लावलेले शेकडो तरुण रॅली सुरू होण्याची उत्सुकतेने वाट पाहत होते.सुधीरदादा चौकात येताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनी श्री मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली.



सजवलेल्या वाहनामध्ये उभे असलेले सुधीरदादा गाडगीळ दुतर्फा गर्दी करून असलेल्या नागरिकांना अभिवादन करीत होते. त्यांच्यासोबत माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे,भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग,भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धीरज सूर्यवंशी,  शिवसेनेचे नेते नानासाहेब शिंदे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे,पैलवान सुबराव मद्रासी होते.
भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीचे झेंडे फडकवत मोटार सायकलस्वार रॅलीत सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्ष, महायुती तसेच सुधीरदादा गाडगीळ यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. रॅली  सुरू असतानाही रस्त्यात ठिकठिकाणी मोटरसायकल स्वार येऊन रॅलीला मिळत होते.



 सांगली शहरातून फिरून मोटरसायकल रॅली विश्रामबागमधील गणेश मंदिरासमोर आली. त्यावेळी तेथे जाहीर सभा झाली.
मोटरसायकल रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झालेले पाहून सुधीरदादा गाडगीळ यांनाही भावनावेग आवरता आला नाही. ते म्हणाले, कार्यकर्त्यांचे हे प्रचंड प्रेम पाहून मला खरोखरच आज शब्द सुचत नाहीत. बोलणे अशक्य झाले आहे. भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्या प्रचारासाठी गेले पंधरा दिवस अथक प्रयत्न केले आहेत. आजची रॅली यशस्वी करण्यासाठी पक्षाचे तसेच महायुतीचे सर्व नेते, कार्यकर्ते, बूथ प्रमुख तसेच पन्ना प्रमुख यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
 आमदार गाडगीळ म्हणाले, गेली दहा वर्षे मी सांगली मतदारसंघाची मनोभावे सेवा केली आहे. अजूनही मला सांगली मतदारसंघासाठी खूप काम करायचे आहे. आपल्याला हे  शहर आणि हा मतदारसंघ  आदर्श बनवायचा आहे. त्यासाठी मला मतदानातून बळ द्या. पुढचे दोन दिवस पूर्णपणे ताकद एकवटून जास्तीत जास्त मतदान घडवून आणा. तुम्ही मला मतांच्या रूपाने जे बळ द्याल त्याच्या जोरावर मी पुढील पाच वर्षे सांगलीची सेवा करण्यासाठी देणार आहे.
माजी आमदार दिनकरतात्या पाटील म्हणाले, महायुती शासनाने महिलांसह गोरगरीब नागरिक, शेतकरी यांच्यासाठी असंख्य योजना राबवल्या आहेत. सुधीरदादांनी गेल्या दहा वर्षात विकासकामानी शहराचा आणि मतदारसंघाचा कायापालट केला आहे. पुढचे दोन दिवस आपल्याला याच कामाची माहिती लोकांना द्यायची आहे.जास्तीत जास्त मतदान घडवून आणा. आपल्याला विक्रमी मताधिक्क्याने सुधीरदादांना विजयी करायचे आहे हे लक्षात ठेवा.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार म्हणाले, आजच्या मोटारसायकल रॅलीचे ऐतिहासिक असेच वर्णन करावे लागेल. आजपर्यंत सांगलीत प्रचार सांगतेच्या वेळी अशी रॅली झाली नसेल. भारतीय जनता पक्षाचे सर्व बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे योगदान प्रचार काळात तसेच आजच्या मोटरसायकल रॅलीच्या संयोजनात मिळाले आहे.आता आपल्याला मतदानावर लक्ष केंद्रित करायचे आहे. जास्तीत जास्त मतदान होईल याकडे सगळ्यांनी लक्ष केंद्रित करा. 
आमदार गाडगीळ आणि सर्व सहकारी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी  श्री गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर या भव्य मोटारसायकल रॅलीची सांगता झाली.
रॅलीत भारतीय जनता पक्षाचे शरद नलवडे, विश्वजित पाटील, शैलेश पवार, विजय साळुंखे, अतुल माने, शरद देशमुख, भरत खांडेकर, शुभम चव्हाण, रोहित जगदाळे, कृष्णा राठोड आदींचा सहभाग होता. सांगली मतदार संघातील सर्व गावातून तसेच सांगलीवाडी, कुपवाडमधूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.
....