सुरज फाउंडेशनचे संस्थापक ट्रस्टी मा. श्री. प्रवीणजी लुंकड यांचा 70 वा वाढदिवस सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडात्मक उपक्रमांच्या माध्यमातून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल येथे आयुष सेवाभावी संस्था, कुपवाड व मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पालक व विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ईसीजी, डोळ्यांची तपासणी, हाडांची तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या उपक्रमास पालक व संस्थेतील कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी मा. प्रवीणजी लुंकड यांच्यासाठी सादर केलेल्या शुभेच्छा गीताने करण्यात आली. आरोग्य शिबिराचे उद्घाटन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मा. श्री. राजेसाहेब लोंढे साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी सांगली जिल्हा शिवसेना अध्यक्ष बजरंगभाऊ पाटील, आयुष सेवाभावी संस्थेचे संस्थापक अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
उद्घाटनानंतर मा. राजेसाहेब लोंढे साहेब यांनी शाळेतील इनोवेशन हब, स्पेस लॅब व मल्टीस्किल विभागांची पाहणी करून संस्थेच्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मा. प्रवीणजी लुंकड यांच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट वाटप करण्यात आले. तसेच हेल्पेज इंडिया यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या अॅडजस्टेबल स्टिक गरजू पालकांना वितरित करण्यात आल्या. आपल्या मनोगतात त्यांनी शाळेची प्रगती कौतुकास्पद असून भवितव्य उज्ज्वल असल्याचे सांगत संस्थेच्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
दरम्यान, सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी मा. प्रवीणजी लुंकड यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सांगली जिल्ह्यातील आमंत्रित आठ संघांच्या 17 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सदर स्पर्धा 13 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहेत. विजेत्या संघांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहेत. यासोबतच 17 वर्षांखालील मुलींच्या फुटसॉल स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले.
यानंतर नव कृष्णा व्हॅली स्कूल येथील सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्वागत गीत, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनोगत झाले. मा. प्रवीणजी लुंकड यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच सर्वांना खाऊ देण्यात आला. त्यानंतर नव कृष्णा व्हॅली स्कूल येथे आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.
सदर सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी अधिकराव पवार मुख्याध्यापक नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम ,प्रशांत चव्हाण उप प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम, रघुनाथ सातपुते एडमिन ऑफिसर सुरज फाउंडेशन, विनायक जोशी स्पोर्ट्स इनचार्ज यांचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सामाजिक बांधिलकी, गुणवत्तापूर्ण शिक्षण व क्रीडा विकासाचा संदेश देत मा. श्री. प्रवीणजी लुंकड यांचा 70 वा वाढदिवस आदर्श पद्धतीने साजरा करण्यात आला.



