अतिवृष्टी मदतीच्या पैशांचे 'कटिंग' करू नका: संजयकाका पाटील यांची जिल्हा बँकेकडे मागणी

Admin
By -




            सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून मंजूर झालेले पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत; जुन्या कोणत्याही कर्ज वसुलीसाठी किंवा थकीत बाकीसाठी हे पैसे कापून (कटिंग करून) घेऊ नयेत, अशी कळकळीची मागणी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केली आहे. सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत असून, त्यांची आणखी परीक्षा पाहू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.
माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ यांची बँकेत भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि आपली मागणी त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
 बँक खात्यात पैसे जमा, पण वसुलीची भीती

            जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी यासाठी मा. खासदार संजयकाका पाटील यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले होते, तसेच पंचनाम्यांसाठी गावोगावी जाऊन पाठपुरावा केला होता. त्यांच्या या लढ्याला यश मिळाले असून, संबंधित विभागाने सांगली जिल्ह्यासाठी १४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या मदतीचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
         मात्र, दुसऱ्या बाजूला बँकांनी शेतकऱ्यांचे हे मदतीचे पैसे त्यांना न देता, त्यांच्या इतर थकीत बाकीसाठी जमा करून घ्यायला सुरुवात केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजयकाका पाटील यांनी कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ यांची भेट घेऊन या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवला. त्यांनी वाघ साहेब यांना सदर बाब निर्देशास आणून देत, मदतीच्या पैशांचे 'कटिंग' न करण्याची मागणी केली.

 उद्या राजू शेट्टींसोबत पुन्हा भेट

          शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी उद्या (शुक्रवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह संजयकाका पाटील पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शेतकऱ्यांना मदत मिळण्यातील अडचणींवर तोडगा काढण्याची शक्यता आहे.



            सध्या शेतकऱ्यांच्या वर आसमाने संकट कोसळले आहे. एकेका शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासन शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देऊ शकत नाही त्यांना फक्त मदत दिलेली आहे. त्यात ही जर बँकांनी अशा पद्धतीने पैशाची वसुली चालू केली  तर शेतकऱ्यांची परिस्थिती अजून वाईट होईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे आलेले मदतीचे पैसे त्यांना मिळाले पाहिजेत यासाठी आज बँकेतील अधिकाऱ्यांची भेट घेतली 

 संजय काका पाटील माजी खासदार
Tags: