महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी नंदुरबार जिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी आलेल्या मजूर परिवारातील एका अडीच वर्षाच्या मुलीचे जटा निर्मूलन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले.
याबद्दल सविस्तर माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी ऊस तोडणीसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मजूर येत असतात. असेच नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील काही ऊस तोडणी कामगार कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत. कोल्हापूरातील पैलवान धनंजय भोसले यांना अशाच एका ऊस तोडणी कामगार मजुराच्या कुटुंबातील एका अडीच वर्षाच्या मुलगीच्या केसात जटा झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी संबंधित ऊस तोडणी कामगार कुटुंबीय आणि त्या टोळीतील इतर लोकांशी चर्चा केली असता या जटा देवीच्या आहेत आणि त्या पवित्र आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावर जटा काढण्यासाठी या कुटुंबाने काही प्रयत्न केले का अशी विचारणा केली असता त्या जटा आम्ही काढणार नाही. जटा काढल्या तर आमच्या पाड्यातील शंभर मुलांचा मृत्यू होईल अशा प्रकारची भीती त्या मुलीचे पालक आणि इतर मजुरांनी व्यक्त केली. ही मुलगी मोठी झाल्यावर देवीला सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी धनंजय भोसले यांना सांगितले. या घटनेने धनंजय भोसले यांच्यातील बाप जागा झाला आणि ते अस्वस्थ झाले त्यांनी त्यांचे मित्र जयसिंगपूर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मालोजीराव भोसले यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. मालोजीराव भोसले यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती आणि जिल्हा कार्याध्यक्ष रेश्मा खाडे यांना संपर्क करून संबंधित मुलीच्या जटांबद्दल आणि त्या कुटुंबीयांच्या मनातील भीतीबद्दल कल्पना दिली. मालोजीराव माने आणि धनंजय भोसले यांच्याशी बोलणे झाल्यानंतर कृष्णात स्वाती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष रेश्मा खाडे, रामदास देसाई, राजवैभव शोभा रामचंद्र, मोहित पोवार हे कार्यकर्ते संबंधित कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्यांच्या पालांवर पोहोचले. मुकादमाच्या माध्यमातून या कुटुंबीयांची भेट घेतली असता मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीच्या केसात असलेली जट तिच्या जन्मापासून असल्याचे सांगून ती जट आम्ही काढणार नाही असे ठामपणे सांगितले. कुटुंबीयांच्या मनात मनातील भीती लक्षात घेऊन त्यांच्याशी मुलीच्या भविष्याविषयी काळजी व्यक्त करत भावनिक संवाद साधला. कार्यकर्त्यांनी मुलीच्या केसांतील जट काढल्याबद्दल कुणाचे काही वाईट होणार असेल तर ते आम्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचे होऊ दे. तुम्हाला किंवा त्या मुलीला काहीही होणार नाही अशा प्रकारचा आधार देण्याचा प्रयत्न केला. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत केलेल्या जटा निर्मूलनाच्या घटनांबाबतचे फोटो आणि व्हिडिओ दाखवून संबंधित कुटुंबीय आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर ऊस तोडणी कामगारांना माहिती दिली. दीर्घ संवादानंतरसुद्धा त्या मुलीच्या पालकांचे मुलीच्या केसांतील जटा काढण्याचे धाडस होत नव्हते. यावर कार्यकर्त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खानदेश विभाग राज्य सरचिटणीस विनायक सावळे आणि सामाजिक कार्यकर्त्या रंजना पावरा यांना फोन लावून संबंधित कुटुंबीयांशी बोलणे करून दिले. या बोलण्याने कुटुंबीयांना थोडासा आधार आला. तरीही जटा काढल्यानंतर आपली मुलगी काहीतरी गंभीर आजारी पडेल अशी भीती त्यांच्या मनात होती. यावर कार्यकर्त्यांनी तुम्ही जोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात आहात तोपर्यंत आम्ही कार्यकर्ते तुम्हाला लागेल ती वैद्यकीय मदत तात्काळ उपलब्ध करून देऊ. तसेच नंदुरबार जिल्ह्यात परत गेल्यावर तेथील कार्यकर्ते सुद्धा तुमच्या मुलीच्या आरोग्याची काळजी घेतील असा आधार दिला. यानंतर हे कुटुंबीय मुलीच्या केसांतील जटा काढण्यासाठी तयार झाले. शेवटी आपली मुलगी जटामुक्त झालेली मुलगी पाहिल्यानंतर मुलीचे आई आणि बाबा यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पसरलेले पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी केलेले प्रबोधन आणि नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी दिलेला आधार यामुळे ज्या क्रांतीबा ज्योतिबा फुले यांनी बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली केली त्यांच्या स्मृतिदिनी एका अडीच वर्षाच्या केसांतील जटा काढून तिच्यासाठीही शिक्षणाची दारे खुली झाली आणि तिच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली. या मुलीच्या केसांतील जटा काढल्यानंतर सर्व कार्यकर्ते, कुटुंबीय आणि उपस्थित ऊसतोडणी कामगार यांनी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. धनंजय भोसले यांनी एका बालिकेच्या केसांत जट पाहून दाखवलेल्या जागरुकतेचे परिसरातील सर्व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
या जटा निर्मूलनासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रामदास देसाई, राजवैभव शोभा रामचंद्र, मोहित पवार, पैलवान धनंजय भोसले, मालोजीराव माने, गणेश मोरे, निखिल जाखले. श्रेयस वाईंगडे यांनी मदत केली.