तोरणा भूईकोट किल्ल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

Admin
By -




           शिराळा २ सप्टेंबर येथील तोरणा भूईकोट किल्ल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. छ. शंभूराजांना संगमेश्वर येथे कैद करून मुघल सैन्य घेऊन जात असताना येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर राजांना सोडविण्याचा एकमेव प्रयत्न केला गेला. मात्र त्यात यश आले नाही. या ऐतिहासिक घटनेचा व त्यातील सहभागी ४०० मावळे, किल्लेदार व सरदारांच्या स्मृती जतन करण्यासाठी आमदार असताना मा. मानसिंगराव नाईक यांनी स्मारकाच्या आराखड्यास शासनाकडून मंजुरी मिळवली. त्यासाठी २५ पैकी १३.५० कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष उपलब्ध केला. त्या स्मारकाचे भूमिपूजन आज श्री. मानसिंगभाऊ यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान शहरातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पदयात्रा सुरू झाली. यात हजारो शिव-शंभू प्रेमी महिला, पुरुष सहभागी झाले होते. गावातील प्रमुख मार्गावरून गेलेल्या फेरीत पालखीत शिवपुतळा ठेवण्यात आला होता. मावळे, मेघडंबरी, भगवा ध्वज, फेटे व टोप्या घातलेले हजारो जणांनी निघालेली ही पदयात्रा लक्षवेधी ठरली. फेरीचे आगमन तोरण किल्ल्यावर झाल्यावर स्मारकाच्या जागेत श्री. मानसिंगभाऊ यांच्यासह विजय दीक्षित, प्रसाद दीक्षित, शुभम देशमुख, प्रशांत देशमुख, दीपक पवार आदींच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडला. 





स्मारकाच्या वास्तू रचनाकार सौ. कांचन पाटील यांनी स्मारक कशा पद्धतीने उभारले जाणार आहे, याची सचित्र माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक युवा नेते विराज नाईक यांनी केले. यावेळी मान्यवरांचा व शिराळकरांच्या वतीने श्री मानसिंगभाऊंचा सत्कार पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, प्रमुख पाहुणे छ. शिव-शंभू अभ्यासक प्रा. अरूण घोडके व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मानसिंगभाऊ यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक विजयराव नलवडे यांनी आभार मानले. गोपाल पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास नाईक कुटुंबीय, शिराळा मतदार संघातून आलेले अनेक मान्यवर मंडळी, विश्वास, विराज व दूध संघाचे संचालक, शिराळा शहरातील विविध मान्यवर, व्यापारी, युवक, माता-भगिनी उपस्थित होते.
Tags: