प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील - आ. जयंतराव पाटील

Admin
By -



        चांदोली अभयारण्य व वारणा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन आढावा बैठक घेतली. प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

          प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या मदतीच्या बाबतीतील कागदपत्रे सध्या वन विभागाच्या वतीने वित्त विभागाकडे पाठविल्याची माहीती आ.जयंतराव पाटील यांनी बैठकीत दिली. 

         पाठबंधारे विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निर्वाह भत्त्याबाबत ३४५ प्रकल्पग्रस्तांपैकी १०४ खातेदारांना वाटप पुर्ण झाले असुन उर्वरित पात्र खातेदारांच्या करीता निधी मागणी करण्यात आला आहे. अशी माहिती वारणा पाठबंधारे विभागाचे अभियंता श्री. नितेश पोतदार यांनी दिली. 

        या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना जमिन देणे, निर्वाह भत्ता निधी, जमिन प्लॉट वाटप, प्रकल्पग्रस्तांना १ ते ६ शर्ती कमी करुन वर्ग २ मधुन १ करणे, चुकलेल्या ताली व घरे यांचे मूल्यांकन करणे, चुकलेले खातेदार व भुमिहीन प्रकल्पग्रस्तांना कागदपत्रे पडताळणी करुन त्यांना यादीत समाविष्ट करणे, खातेदारांना घरबांधणी अनुदान देणे, नागरी सुविधा पुरविणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच इस्लामपूर शहरातील निनाईनगर वसाहतीतील प्लॉट मोजणी मोजणी फी शासनाने भरावी अशी मागणी देखील आ. जयंतराव पाटील यांनी केली. 

       या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, वाळवा तहसीलदार सचिन पाटील, शिराळा तहसीलदार श्यामला खोत, सांगली अप्पर तहसीलदार आश्विनी वरुटे, सविता लष्करे, एस. डी. पाटील, वनविभाग, जलसंपदा विभागाचे अधिकारी, संजय बजाज, खंडेराव जाधव व प्रकल्पग्रस्त नागरिक आदी उपस्थित होते.