यंदा झालेल्या अतिवृष्टी वर मात करत नागठाणे (ता. पलूस) येथील निवृत्त सैनिक, द्राक्ष बागायतदार धनाजी जयसिंग पाटील यांच्या कृष्णा या काळ्या द्राक्षाला ५५१ रुपये चार किलोस असा विक्रमी दर मिळाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यावर्षी झालेला पाऊस, पडणारे धुके यामध्ये अनेक फुलोरा अवस्थेत असणाऱ्या द्राक्षबागा अडचणीत आल्या, शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चाचे लाखो रुपये वाया गेले. यातून काही बागा शेतकऱ्यांनी वाचवल्या आहेत. या पैकीच धनाजी पाटील हे आहेत. यांची पावने दोन एकर द्राक्ष बाग दरवर्षी ते मोठ्या जिद्दीने ती पिकवतात. यंदा द्राक्ष बाग बदलत्या वातवरणात मोठ्या कष्टाने त्यांनी वाचवली आहे.
द्राक्षे वटवाघळांच्या तावडीतून वाचवण्यासाठी बागेवर जाळी अंथरली, बदलत्या वातावरणाचा सामना करत अखेर त्यांना ५५१ रुपये ४ किलो असा सौदा फिक्स झाला आहे सरासरी किलोला 137 रुपये भाव त्यांना मिळणार आहे. पावने दोन एकरात 13 टन द्राक्ष उत्पादन त्यांना मिळेले असे पाटील यांनी सांगितले.
अनेक आपत्तीमुळे यावर्षी द्राक्षपीक कमी आहे. बागायतदारांनी अजिबात घाईगडबडीत व्यवहार करू नयेत, व्यापारी आणि दलाल दर पाडून मागतात. पावसाची भीती घालतात. त्याला अजिबात फसू नये, द्राक्ष बागायतदारांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे, म्हणजे फसवणूक टळेल. नवीन व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करताना दक्षता घ्यावी, असे आवाहन धनाजी पाटील यांनी द्राक्ष उत्पादकाना केले आहे.