पृथ्वीराज पाटील :नागरिकांच्या संवादातून विकसित सांगलीचा संकल्प साकारणार
सांगलीकर हे शहराचे कान व डोळे आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्याकरता त्यांना काय हवं.. काय नको यासाठी त्यांनी बोलायचं आम्ही ऐकायचं आणि त्यांच्या कडून प्राप्त सूचना एकत्रित करुन भविष्यातील चांगल्या सांगलीचा संकल्प करायचा या हेतूने 'संवाद सांगलीसाठी' हा उपक्रम हाती घेतला आहे असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. इंजिनिअर्स अँड आर्किटेक्टस असो. च्या सभागृहात आयोजित 'संवाद सांगलीसाठी' या उपक्रमात नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
प्रारंभी दिपप्रज्वलन करण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष केदार टाकवेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर पृथ्वीराज यांनी 'संवाद सांगलीसाठी'या उपक्रमाची भूमिका विशद केली.
या बैठकीत डी. पी. तायवाडे पाटील, रविंद्र खिलारे, जयराज सगरे, प्रमोद पारेख, के. के. शहा,राजेंद्र जाधव, तात्या खोत, सुरेश केरीपाळे, डी. बी. शिंदे, शैलेश पवार, सुनील माणकापुरे, सचिन वाघमोडे, दिलीप पाटील यांनी विविध समस्या मांडल्या.
दुपारी चार वाजता सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असो. च्या सभागृहात संवाद सांगलीसाठी या उपक्रमात बाळासाहेब कलशेट्टी,भारत बोथरा, सुरेंद्र बोळाज, महेश पाटील, जयंत सावंत, आशिष सावळे, विजय चव्हाण, लाले वकील,राजू सावळे यांनी ट्रक मालक व चालक यांच्या समस्या मांडल्या.
संवाद सांगलीसाठी उपक्रमांतर्गत आज या दोन्ही ठिकाणी सांगलीला भेडसावणाऱ्या लाईट, पाणी, रस्ते, उद्याने, क्रिडांगण, वहातूक नियंत्रण, पार्किंग, नाट्यगृह, प्रशासनावर अंकुश, घरपट्टी, गुन्हेगारी इ. प्रश्नावर चर्चा झाली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या व विकास योजनांच्या सूचनांचे एकत्रिकरण करुन भविष्यातील चांगल्या सांगलीचा संकल्प साकारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.आभार रविंद्र खिलारे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले.